अवैध लाकूड तस्करीचा डाव उधळला; रावेर वन विभागाची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर रावेर वन विभागाने अवैध लाकूड भरलेल्या एका आयशर ट्रकवर अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध कारवाई करत तस्करीचा डाव उधळला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि वाहने पुढील कारवाईसाठी तत्काळ मध्य प्रदेश वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आली असून, वन विभागाच्या या धडक कृतीमुळे तालुक्यात ‘वन विभागाची सर्जिकल स्ट्राईक’ अशी चर्चा सुरू झाली आहे.

रावेर वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना ५ मे रोजी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर वन विभागाच्या पथकाने रावेर ते चोरवड रस्त्यावर मध्य प्रदेश सीमेलगत विशेष गस्त मोहीम राबवली. याच गस्तीदरम्यान, लोणी गावाजवळ संशयास्पद स्थितीत MH 04 CU 5418 क्रमांकाचा एक आयशर ट्रक आणि MH 19 Z 7862 क्रमांकाचा एक ट्रॅक आढळून आला. पथकाने त्वरित या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्यात विनापरवाना पंचरास जातीचे लाकूड भरलेले आढळले. जप्त केलेल्या लाकडाचा अंदाजे साठा ३१ घनमीटर इतका असून, त्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे ४३ हजार ४०० रुपये इतकी आहे. या लाकडासह जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत ५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.

या कारवाईतील एक महत्त्वाची बाब म्हणजे, वन विभागाने केलेल्या तपासणीत सदर अवैध लाकूड वाहतुकीचा गुन्हा प्रत्यक्ष मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले. यानंतर रावेर वन विभागाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मध्य प्रदेश वन विभागाशी संपर्क साधला आणि त्यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. माहिती मिळताच मध्य प्रदेश वन विभागाचे वनपाल युनुस दाऊदी, वनरक्षक आर.डी. काजळे आणि वीरेंद्र कुमार हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी रावेर वन विभागाच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेले वाहन आणि लाकडाचा मुद्देमाल रीतसर ताब्यात घेतला. या गुन्ह्यासंबंधी पुढील सर्व कायदेशीर कारवाई आता मध्य प्रदेश वन विभागाकडून केली जाणार आहे.

मुख्य वनसंरक्षक, धुळे नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, यावल वन विभाग जमीर शेख, विभागीय वन अधिकारी, दक्षता, धुळे आर.आर. सदगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक, यावल समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेत वनपाल अरविंद धोबी, वनरक्षक सहस्त्रलिंग, आयेशा पिंजारी, जगदीश जगदाळे, वनमजूर सुभाष माळी आणि वाहन चालक विनोद पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे योगदान दिले.

Protected Content