सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रस्ता तयार करण्यासाठी कोणतीही अधिकृत प्रक्रिया न राबविता वृक्षांची अवैध कत्तल करून लाखो रूपयांच्या लाकडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, सावदा-रोझोदा-कोचुर-खिरोदा-सावखेडा रोड दरम्यान सार्वजनिक बांधकाम यांच्या हद्दीत असलेली विविध जातीच्या लाखो रुपये किमतीची झाडांची अवैध तोड करून परस्पर विक्री केली जात आहे. सावदा ते सावखेडा दरम्यान ३३केव्ही उच्च दाब विजवाहिणी नवीन सब स्टेशन साठी टाकण्याचे काम सुरू असून सार्वजनिक बांधकाम यांचे हद्दीत असलेली झाडे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काही लोकांनी तोडून परस्पर विक्री केली आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम व वन विभाग अनभिज्ञ असून कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही. दरम्यान ही झाडे लाखो रुपये किमतीची असून एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी व जगण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करीत असताना शासन हद्दीतील एका विभागाची झाडे परस्पर तोडत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्या चौकशीची मागणी केली आहे.
या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांच्याकडे माहिती घेतल्यास आमच्या हद्दीतील कोणती झाडे तोडण्यास आम्ही परवानगी दिलेली नाही असे सांगण्यात आले. तथापि, याच विभागातील एका अधिकार्याकडून आम्ही झाडे विकत घेतली असल्याचे तोडणारे व लाकडांचा व्यापार करणारे व्यापारी सांगतात त्यामुळे सार्वजनिक बांधकामाचे आर्थिक लागेबंधे या वृक्षतोड करणार्या लोकांसोबत नाही ना या निमित्ताने शंका उपस्थित होत असून सार्वजनिक वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप कोचुर येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या तोडलेल्या झाडांची वाहतूक सर्रासपणे होत असून वन विभागाचे भरारी पथक काही ट्रॅक्टर सोडून देत आहेत तर तक्रारीनुसार एक दिवस एक टाटा ४०७ ही मालवाहतूक गाडी वन विभागाने केवळ देखावा म्हणून पकडलेली आहे
या संदर्भात पुढे बोलतांना कमलाकर पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम कडून यापूर्वीही अनेक झाडे कवडीमोल भावात विकून अशाच प्रकारे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला गेला आहे कोणत्याही प्रकारचा लिलाव न करता वनविभागाकडून मूल्यांकन न करता मोठ्या प्रमाणात झाडे काही लोकांना विक्री केल्याचे समोर आले आहे त्यामुळे या लाकूडतोड करणार्या व्यापार्यांची सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा येथील अधिकार्यांचे आर्थिक कनेक्शन तर नाही ना ? असा प्रश्न देखील कमलाकर पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रकरणी वन खाते आणि सार्वजनीक बांधकाम खात्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.