अवैध गौण खनिज वाहतुकीचा डाव उधळला; ६ डंपर, १ जेसीबी जप्त !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कडगाव शिवारात वाघूर नदीजवळ सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांनी सोमवारी (३० जून २०२५) दुपारी २ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत छापा टाकला. पोलीस आणि महसूल पथकाची गाडी पाहताच वाहने सोडून पळ काढणाऱ्या अवैध गौण खनिज तस्करांना पाठलाग करून पकडण्यात आले.

तहसीलदार नीता लबडे यांना कडगाव शिवारात वाघूर नदीजवळ मुरूम उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, त्यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईदरम्यान, उत्खनन करत असताना ६ डंपर आणि १ जेसीबी असे एकूण सात वाहने रंगेहाथ पकडण्यात आली.

नशिराबाद पोलिसांच्या बंदोबस्तात हे सर्व जप्त केलेले साहित्य भुसावळ येथील तहसील कार्यालयात सायंकाळपर्यंत जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.

या यशस्वी कारवाईत तहसीलदार नीता लबडे यांच्यासह महिला मंडळाधिकारी रजनी तायडे, भुसावळ मंडळाधिकारी प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, तलाठी नितीन तेली, गोपाळ भगत, मंगेश पारिसे, रोशन कापसे, तेजस पाटील, जितेश चौधरी, संदीप पाटील आदींनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.