जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, मंगळवार, १ जुलै रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वावर आधारित कुशल दर्जाचे वेतन, भत्ते, तसेच जादा कामाचा मोबदला आणि कायदेशीर रजा व इतर सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक आरोग्यसेवेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या समस्यांबाबत यापूर्वी १३ मे २०२५ रोजी मुंबईत आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून आश्वासने देण्यात आली होती, मात्र त्यानंतर चालकांच्या मागण्यांबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका किंवा पुरवठादारांकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप चालक युनियनने केला आहे.
१५ जूनपर्यंत चर्चा करून मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी चालकांनी केली होती. त्यानंतरही ३० जूनपर्यंत प्रशासनाकडून किंवा पुरवठादारांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर आज १०८ रुग्णवाहिका चालक युनियनने बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम आरोग्यसेवेवर होऊ शकतो. शासनाने आणि संबंधित पुरवठादारांनी तातडीने या मागण्यांवर लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी चालक युनियनने केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार चालकांनी व्यक्त केला आहे.