खामगाव शासकीय तंत्रनिकेतनला ‘अतिउत्कृष्ट’ मानांकन; विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी


खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या गुणवत्ता तपासणीत शासकीय तंत्रनिकेतन, खामगावने मोठी झेप घेतली आहे. संस्थेतील संगणक, विद्युत आणि यंत्र अभियांत्रिकी विभागांना “अतिउत्कृष्ट” मानांकन प्राप्त झाले असून, अणुविद्युत आणि स्थापत्य या विभागांना यापूर्वीच राष्ट्रीय मानांकन (NBA, नवी दिल्ली) मिळाले आहे. अशाप्रकारे, संस्थेच्या इतिहासात प्रथमच सर्वच शाखांना ‘अतिउत्कृष्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे, ज्यामुळे या ग्रामीण भागातील संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी बाह्य शैक्षणिक अवेक्षण चमूने संस्थेला भेट देऊन अभ्यासक्रमांची गुणवत्ता तपासली होती. या चमूत चेअरमनसह ३ विषयतज्ञांचा समावेश होता. चमूच्या स्वागतानंतर संस्थेचे शैक्षणिक अवेक्षक प्रा. राजेश मंत्री यांनी सादरीकरण केले आणि चमूने विचारलेल्या प्रश्नांची संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.

मंडळाच्या निकषानुसार, चमूने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोईसुविधांचा सखोल आढावा घेतला. यात कार्यशाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा (संगणक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भाषा), वसतिगृहे (मुले व मुली), जिमखाना, खेळांची मैदाने, माजी विद्यार्थी सभागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुलींसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, प्रशिक्षण व आस्थापना कक्ष, प्लेसमेंट रेकॉर्ड्स यांचा समावेश होता. तसेच, विविध समित्यांच्या फायली व कागदपत्रांची पाहणी करून समिती प्रमुखांना प्रश्न विचारण्यात आले. कार्यालयातील आस्थापना, अकाऊंट, विद्यार्थी विभाग, कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अशा सर्व बाबी तपासण्यात आल्या. विषयतज्ञांनी शैक्षणिक व प्रयोगशाळेतील बाबी तपासल्या आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्याच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली, सहसंचालक श्री. मनोज अंधारे यांच्या मार्गदर्शनातून आणि प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांच्या कौशल्यपूर्ण प्रशासनात संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी संस्थेला अग्रेसर करण्यासाठी झटत आहेत. संस्थेचे प्लेसमेंट रेकॉर्ड उत्कृष्ट असून, २४२ विद्यार्थ्यांची विविध उद्योगांमध्ये निवड झाली आहे. या मानांकनाचा परिसरातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या रूपाने निश्चितच फायदा मिळेल, असे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी म्हटले आहे. सदर वृत्त संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रा. राजेश मंत्री यांनी परिपत्रकाद्वारे दिले.