अवैध धान्य साठा प्रकरण : चौधरी ट्रेडर्सच्या मालकासह एकावर गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रावेरात अवैध धान्यसाठा करणार्‍या दोन गोदामांना सिल केल्या नंतर अखेर आज दहाव्या दिवशी आठ लाखाचा धान्यसाठा केला म्हणून चौधरी ट्रेड्सच्या मालकासहीत एकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असुन धान्यसाठा करणार्‍यांची झोप उडाली आहे.

या बाबत वृत्त असे दि ३१ रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या तपासणीत शहरातील बर्‍हाणपूर रोड वरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैधसाठा आढळुन आल्याने हे गोदाम सिल करण्यात आले होते. मागील दहा दिवसात या प्रकरणी अहवाल व चौकशी करण्यात आल्या नंतर आज दि १० जून रोजी पुरवठा अधिकारी डी. के. पाटील यांनी रावेर पोलिस स्थानकात येऊन फिर्याद दिली आहे.

यामध्ये आरोपी गणेश देवराम चौधरी रावेर यांच्या चौधरी ट्रेडर्स नावाच्या गोदामात एकूण ७ लाख ७७ हजार २०० रुपयांचा धान्यसाठा आढळुन आला. यामध्ये ९७ गहू कट्टे; २०८ तांदुळाचे कट्टे; ११ ज्वारी कट्टे; १८० मका कट्टे आणि १७,२५० बारदान आढळले. तर संशयित आरोपी मो. रिहान शेख मोईम (रा नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामामध्ये २७,४५० रुपये किमतीचा माल यात ८ गहु कट्टे १७ तांदळाचे कट्टे असा एकूण दोघे गोदामा मध्ये आठ लाख ०४ हजार ६५० रुपये किमतीच्या धान्याचा अवैध साठा मिळून आला.

या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशनला जिवनावश्यक कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे दोन्ही संशयित आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहेत.

Protected Content