पहूरच्या गोगडी धरणावरून हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा

पहूर, ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ , पहूर कसबे आणि सांगवी या तीन गावांची तहान भागविणार्‍या गोगडी धरणाने तळ गाठलेला असतानाही धरणातून हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा सुरूच असल्याने लघु पाटबंधारे उपविभागाच्या अभियंत्यांनी शेतकरी बांधवांना केलेले आवाहन निष्फळ ठरले की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

या संदर्भातील माहिती अशी की, सध्या भीषण उन्हाळा असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणामध्ये आहे. धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने गावावर पाणीटंचाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. यातच ५० ते १०० वीज पंपाद्वारे हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा शेतकरी बांधवांकडून केला जात आहे.

पाणी टंचाईचे सावट दूर होण्यासाठी पहूर कसबे ग्रामपंचायतीने निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबळकर यांना लेखी निवेदन दिलेले आहे. तसेच जामनेर लघु पाटबंधारे उपविभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी देखील प्रत्यक्ष धरणावर भेट देऊन शेतकरी बांधवांना स्वतःहून मोटारी काढण्याचे आवाहन केले .तळपत्या उन्हात पिके वाचविण्यासाठी शेतकरी बांधव धरणातून पाणी आपल्या शेतात नेत आहेत . परंतु यामुळे गावावर पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल लागली आहे.

दरम्यान, या संदर्भात, ग्रामपंचायतीनेही नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे .पाणीटंचाईचे संकट समोर दिसत असतानाही गावकर्‍यांतर्फे नळांना तोट्या न बसविता सर्रासपणे पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या नळांना जाणीवपूर्वक तोट्या बसवल्या पाहिजेत. ग्रामपंचायतीनेही विशेष बाब म्हणून स्वतः पुढाकार घेऊन तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नातून पहुर गावावर आलेले पाणीटंचाईचे संकट दूर सारता येणे शक्य आहे मात्र त्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Protected Content