मुंबई । दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शेतकऱ्यांशी लढण्याचा प्रयत्न कराल तर मार खाल, असा इशारा ट्विट करून दिला आहे.
‘पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानचे शेतकरी दिल्लीत पोहचत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, केंद्राने नवीन कायद्यानुसार मिनिमम सपोर्ट प्राईज (किमान आधारभूत किंमत) नष्ट केली आहे. आम्हीही सरकारला विचारतो की, जर तुम्ही बाजारपेठा नष्ट केल्या आहेत तर मिनिमम सपोर्ट प्राईज कशी मिळेल?. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांशी लढण्याचा प्रयत्न केला तर सरकार मार खाईल,’ असे ट्विट करत आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा आणि सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याला अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. पंजाब, हरियाणासहीत सहा राज्यांत या कायद्याचा शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात येत आहे.
शेतकरी संघटनांनी यासंदर्भात केंद्र सरकारशी दोन वेळा चर्चा केली होती. मात्र ती निष्फळ ठरल्यानंतर तब्बल 500 शेतकरी संघटनांशी निगडीत आंदोलक शुक्रवारी अखेर राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील बुराडी भागातील निरंकारी मैदानावर ठाण मांडून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.