मी कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील

पुणे: कोल्हापूर सोडून पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे वक्तव्य केले आहे. ते पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्यात बोलत होते.

अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. ‘पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते’, असा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी करताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ‘ नाही मी जाणार, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका’, असा टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला. या निवडणुकीत पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागला आहे. यावर पाटील यांनी मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य देखील केले होते.

 

 

 

Protected Content