मी पक्ष सोडणार नाही, मला भाजपने पक्षाबाहेर काढावे – पंकजा मुंडे

pankaja

बीड, वृत्तसंस्था | मी आतापासून भाजपच्या कोअर कमिटीची सदस्यही नाही, मी आता बीडची जनता प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवून रस्त्यावर उतरणार आहे. मी पक्ष सोडणार नाही, मला भाजपने पक्षाबाहेर काढावे, असे सांगून पंकजा मुंडे यांनी आपल्या वेगळ्या वाटेचे स्पष्ट संकेत दिले. आज (दि.१२) परळी येथे गोपीनाथ गडावर आयोजित स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ७० व्या जन्मदिन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.

 

यावेळी त्यांनी स्पष्ट म्हटले की, मी आता राज्यातील जनतेकडून कौल घेवून पुढली वाटचाल ठरवणार आहे. नवा पक्ष स्थापन करायचा की दुसरीकडे कुठे जायचे याचा निर्णय नंतर होईल. सध्या माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त करून शिवसेनेशी जवळीकीचे संकेत दिले.

त्याआधी त्यांनी “मी बंड कुणाविरुद्ध आणि का करेन ? माझ्या कुणाकडूनच काही अपेक्षा नाहीत. माझ्या अपेक्षा फक्त माझ्या वडिलांकडून होत्या. त्यांची तर समाधी कमळावर आहे. माझ्यावर असे संस्कार नाहीत. तुम्ही माझी पोस्ट वाचा, मी त्यात स्पष्ट म्हटले आहे की, देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि तृतीय मी, मग बंड करण्याचा प्रश्न येतोच कुठे ?” असा सवाल उपस्थितांना केला होता. नंतर मात्र त्यांनी नवा पवित्रा जाहीर करीत सगळ्यांना चक्रावून टाकले. येत्या २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे यांच्या नावे प्रतिष्ठानची निर्मिती करून संपूर्ण महाराष्ट्रात ‘मशाल यात्रा’ काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रदेशाध्यक्षांनी पुनर्वसनाचे दिले स्पष्ट संकेत
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेत्यांच्या नाराजीची दखल घेतली जाईल. माणसांची चूक झाली असेल तर कुणी पक्षावर राग काढू नये, शब्द जपून वापरावे, म्हणजे प्रसंगी काही सन्माननीय पर्याय उपलब्ध होवू शकतो, अशा शब्दात नाराज नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे स्पष्ट संकेत दिले.

Protected Content