पुढील पाच वर्षासाठी मीच मुख्यमंत्री- फडणवीस

30BMDEVENDRAFADNAVIS

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तसेच ‘फिप्टी-फिप्टी’ असा कोणताच शब्द दिला नसल्याचे सांगून आपणच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य आज देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना दिपावलीच्या फराळासाठी आमंत्रीत केले होते. याप्रसंगी अनौपचारीक गप्पा करतांना त्यांनी सूचक राजकीय भाष्य केले. ते म्हणाले की, पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री असणार आहे. आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासही मंत्रीमंडळात फिप्टी-फिप्टीचा कोणताही शब्द दिला नसल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नेते सरकार हे महायुतीचेच येणार असल्याचे सांगत असले तरी शिवसेनेने सत्ता वाटपात मोठा वाटा मागितला आहे. तर शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदही हवे आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री असू असे ठामपणे सांगितले. तसेच शिवसेनेला आम्ही कधीही मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नसून मंत्रीमंडळात निम्म्या जागा देण्याचे ठरले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता भाजप आणि शिवसेनेतील दबावतंत्राचा पुढील अंक सुरू झाला असल्यासे दिसून येत आहे. यावर आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content