आजच मंत्रीपद नाकारणार होतो पण. . .बच्चू कडूंचा निर्णय लवकरच !

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्याला मंत्रीपदाचा मोह नसून आजच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नकार कळवणार होतो, मात्र आता त्यांची भेट घेऊन कळवणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे.

 

गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चू कडू यांची नाराजी विविध वक्तव्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. मंत्रालय मिळत नसल्याने ते नाराज होते. मध्यंतरी त्यांच्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय तयार करण्यात आले असून याचीच धुरा कडू यांना मिळण्याची शक्यता आहे. तर अजितदादा पवार यांच्या सत्तेतील आगमनामुळे इतर नेत्यांप्रमाणे बच्चू कडू हे देखील अस्वस्थ झाले असून त्यांनी आज या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते.

 

यानुसार, बच्चू कडू यांनी आज अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदा राज्यमंत्री केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. यानंतर एकनाथ शिंदे यांना आम्ही साथ दिली. त्यांनी देशात पहिल्यांदाच दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केल्याने त्यांचे देखील मी ऋण व्यक्त करतो. मात्र अलीकडच्या काळात सत्तेसाठी जे काही सुरू आहे ते पाहून मंत्रीपदाला नकार द्यावा असे मला वाटते. हा नकार मी आजच कळविणार होतो. तथापि. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. ते म्हणाले की, मला भेटूनच निर्णय घ्या. यानुसार आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून आपला निर्णय जाहीर करणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे.

Protected Content