अजित पवार गटात माझा बळजबरीने प्रवेश केला गेला – किरण शिखरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांच्यानंतर विद्यार्थी नेते किरण शिखरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अजित पवार गटाने मला बळजबरीने त्यांच्या पक्षात प्रवेश करायला लावल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी नेते किरण शिखरे यांनी केला आहे. शिखरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. तसेच आपण मरेपर्यंत शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटले.

जितेंद्र आव्हाड यांच्यासह झालेल्या पत्रकार परिषदेत किरण शिखरे यांनी म्हटले की, धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे माझे अतिशय जवळचे सहकारी होते. मी राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आणि कोकण विभाग अध्यक्ष म्हणून काम पाहात असून ही जबाबदारी मला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मी शर्मा आणि दुहान यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही तशी गळ घातली.

धीरज शर्मा यांना समजावून सांगण्यासाठी मी ओबेरॉय हॉटेलवर गेलो होतो. तेथे मला सांगण्यात आले की, तुमचे सुनिल तटकरे यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही साहेबांना भेटा. मी धीरज शर्मांना स्पष्ट सांगितले की, मला तुमच्या गटात प्रवेश करणे जमणार नाही. माझ्यावर दबाव टाकू नका. मात्र माझे काहीच न ऐकता मला पक्ष कार्यालयात नेऊन ठराविक मंडळीच्या उपस्थितीतपक्षात प्रवेश करायलालावले. याचे फोटोही तुम्ही पाहिले असतील.

किरण शिखरे म्हणाले की, मी त्यांच्या गटात गेलेलो नाही. २४ तासांच्या आत साहेबांकडे आलो आहे. मला खूप टॉर्चर केले गेले. मी कालपासून माझ्या घरी गेलो नाही. मी माझ्या घराबाहेर आहे. माझ्या घरापर्यंत समजूत काढण्यासाठी माणसं पाठवली जात आहे. पण मी कुठल्याही गोष्टीला बळी पडलो नाही. मला सांगितले गेले की, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आंदोलनादरम्यान जो प्रकार घडला त्याचा निषेध कर. तू एससीचा कार्यकर्ता आहे. मी कुठल्या जातीचा आहे हे कधीच पक्षाने पाहिले नाही. माझ्यासोबत दुजाभाव केला गेला नाही. मी राजीनामा द्यावा आणि साहेबांचा निषेध करावा. माझं पॉलिटिकल करिअर संपावे. मला विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बनवतो असे सांगितले होते. दोन दिवसात तुला पक्षाचे लेटर देतो, असे सांगितले गेले. पण मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही.

Protected Content