धरणगाव प्रतिनिधी| मी एक कट्टर शिवसैनिक असून ना.गुलाबराव पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता आहे. माझे जेव्हा लग्न सुद्धा झाले नव्हते, तेव्हाच ना. गुलाबराव व शिवसेना पक्षाने मला सभापती केले होते. त्यामुळे मी शिवसेना सोडण्याचा काही विषयच नाही, सध्याचा प्रकार माझी बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप करून अफवा पसरविण्याऱ्यांंचा निषेध करतो, असे प्रतिपादन दीपक सोनवणे यांनी आज (दि.१३) येथे केला.
दीपक सोनवणे पुढे म्हणाले की, आज माझ्या गावात म्हणजे साळवा येथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांची प्रचार रॅली जात होती, तेव्हा मी घरात होतो. अचानक लोकांची गर्दी दिसली म्हणून मी बाहेर आलो आणि पाहिले की, अपक्ष उमेदवाराची प्रचार रॅली चालू आहे. त्याचवेळी मला जबरदस्तीने त्यांनी घरातून खाली बोलवून माझ्यासोबत फोटो काढून घेण्याचा बालीशपणा केला. नंतर माझे हेच फोटो व्हाट्सएपच्या गृप आणि फेसबुकवर टाकण्यात येवून मी शिवसेना सोडत असल्याची बतावणी करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण सर्वजण एकजुटीने गुलाबराव पाटील यांना मदत करून विजयी करायचे आहे, असे आवाहनही दीपक सोनवणे यांनी केले आहे. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, उमेश चौधरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.