डॉ. चव्हाण बनले देवदूत: चिमुकल्यावर वेळीच उपचार केल्याने मानले आभार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भोणे येथील अत्यंत गरीब कुटुंबातील तीन वर्षीय चिमुकल्याला उन्हाचा तडाखा बसल्याने मध्यरात्री लघवी बंद झाली. त्यामुळे त्याला भयंकर त्रास होत असल्याने मध्यरात्री कोणतीही दवाखाना उघडे नसतांना नाईट ग्रुपच्या सदस्यांच्या मदतीने डॉ. जितेंद्र चव्हाण व त्यांच्या टिमने ग्रामीण रूग्णालयात जावून तीन वर्षाच्या चिमुकल्यावर वेळीच उपचार केले. त्यामुळे चिमुकल्याची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे देवासारखे धावून आलेले डॉ. चव्हाण यांचे कुटूंबियांसह नाईट ग्रुपच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले.

गुरूवारी रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेले भोणे येथील मनोज भिल यांचा 3 वर्षाच्या चिमुकल्याला भरउन्हाचा तडाखा बसल्याने लघवी बंद झाली. त्यामुळे पोट फुगून भयंकर त्रास होत होता. परंतु अश्या रात्री मध्यरात्री त्याच्यावर उपचार होणे कामी गावातील कोणताही दवाखाना सुरू नसल्याने धरणगाव शहरातील धरणी चौकात नाईट ग्रुप सदस्याजवळ चिमुकल्याच्या कुटुंबियांनी “काहीही करा, पण आमच्या ह्या लहान मुलाचा जीव वाचविण्यासाठी मदत करा” अशी विनंती अत्यंत भाव विवश होऊन केली. त्याचक्षणी त्यांना सोबत घेऊन नाईट ग्रुपने ग्रामीण रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी डॉ. चव्हाण व त्यांची टीम हजर असल्याने लगेच प्रथमोपचार करण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी त्याला जळगावला देखील जाण्याची गरज पडली नाही. अगदी योग्य पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्यात डॉ. जितेंद्र चव्हाण यांना यश आले.

आपल्या धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ. जितेंद्र चव्हाण यांचे नाईट ग्रुपतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी दिपक वाघमारे, समीर भाटिया, राजू ओस्तवाल, सिताराम मराठे,ॲड. सागर बाजपाई, अजय महाजन, ॲड. मंगेश लोहार, राहुल भाऊ वाघ तसेच नाईट ग्रुप धरणीचे अध्यक्ष एकनाथ वाघ हे उपस्थित होते.

Protected Content