मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमिवर अतिरिक्त वीज विकत घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. यामुळे लोडशेडींगचे संकट टळणार आहे.
काल मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर विजेच्या मागणीवरून आज पुन्हा बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर मंत्री नितीन राऊत यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ते म्हणाले की, राज्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे राज्य सरकारने अतिरिक्त वीज विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यातील वीजेची मागणीने उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यात तब्बल २८ हजार मेगावॅटपर्यंत वीजेची मागणी ही नोंदवण्यात आली. ही मागणी ३२ हजार मेगावॅटपर्यंत जाईल असा अंदाज आहे. एप्रिल महिना सुरु असून अजून मे महिना बाकी आहे. तेव्हा वाढती वीजेची मागणी लक्षात घेता, भारनियमनाची वेळ येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकरने अतिरिक्त वीज खरेदीचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा १५०० मेगावॅट इतकी वीज विकत घेतली जाणार असून यासाठी लागणार्या निधीला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळालेली आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रावरील लोड शेडींगचे संकट टळल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अघोषीतपणे सुरू असलेल्या लोड शेडींगपासून यामुळे नागरिकांची मुक्तता होणार आहे.