Home क्राईम मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर महामार्गावर भीषण अपघात : भरधाव डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी

मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर महामार्गावर भीषण अपघात : भरधाव डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी

0
3


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील धाबेपिंप्री शिवारात नायगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. सिमेंट-काँक्रीट स्ट्रक्चरचे मशीन घेऊन जाणाऱ्या भरधाव डंपरने एका मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील एका व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मधुकर हिवरे (वय ४२, रा. अजंदे, ता. रावेर) आणि ईश्वर नामदेव पवार (वय ४०, रा. अजंदे, ता. रावेर) हे दोघे आपल्या मोटारसायकलने (क्रमांक एमएच १९ डीडी १८५८) जात असताना मागून येणाऱ्या डंपरने (क्रमांक एमएच १९ सीवाय ४६१७) त्यांना जोरदार धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने प्रल्हाद हिवरे यांचा प्राण गेला, तर जखमी ईश्वर पवार यांच्यावर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बी. एन. अग्रवाल यांच्या चालकांकडून होणाऱ्या अपघातांवर नागरिकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित डंपर चालक रोज नशेत वाहने चालवतात आणि त्यांच्या या कथित हलगर्जीपणामुळे अजून किती निष्पापांचे जीव जाणार, असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, प्रशासनाने अशा बेजबाबदार चालकांची तातडीने वैद्यकीय व नशा तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. या घटनेप्रकरणी जखमी ईश्वर नामदेव पवार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound