Home Cities अमळनेर आईने किडनी दान करून मुलाला दिले नवजीवन ; शहापूरच्या माऊलीच्या त्यागाला सलाम

आईने किडनी दान करून मुलाला दिले नवजीवन ; शहापूरच्या माऊलीच्या त्यागाला सलाम

0
9


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. संकटाच्या काळात आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही त्यागाला तयार असते, याची हृदयस्पर्शी प्रचिती शहापूर, ता. अमळनेर येथे आली आहे. येथील अमोल रवींद्र पाटील (वय ३५) यांची किडनी निकामी झाल्यानंतर त्यांच्या आई रंजनाबाई यांनी स्वतःची किडनी मुलाला दान करून त्याला नवजीवन दिले. गुजरातमधील नडियाद येथे झालेल्या यशस्वी किडनी प्रत्यारोपणानंतर अमोल यांच्या कुटुंबीयांसह शहापूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

अमोल रवींद्र पाटील यांची गेल्या पाच वर्षांपासून तब्येत खालावत होती. कामानिमित्त ते सुरत येथे होते. मात्र, प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांचे कामही सुटले आणि कुटुंबावर आर्थिक भार वाढला. एकुलत्या एक मुलाच्या उपचारांसमोर निर्माण झालेल्या या संकटात आई-वडिलांनी धाडसी निर्णय घेतला. मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी आई रंजनाबाई यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

अमोल यांची किडनी निकामी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. त्यांचे वडील रवींद्र पाटील हे रोजगार सेवक असून, मुलाच्या उपचारांची जबाबदारी आणि आर्थिक अडचणी यामुळे कुटुंब कठीण परिस्थितीतून जात होते. अशा वेळी आईने स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या या माऊलीच्या धैर्यामुळे कुटुंबाला आशेचा किरण मिळाला. गुजरातमधील नडियाद येथे अमोल यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर अमोल यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. आईने आपल्या मुलाला किडनी देऊन केवळ अवयवदान केले नाही, तर त्याला नव्या आयुष्याची संधी दिली आहे. त्यामुळे रंजनाबाई यांच्या त्यागाचे आणि धैर्याचे शहापूरसह अमळनेर तालुक्यात कौतुक होत आहे. आई स्वतःचे दुःख, भीती आणि संभाव्य धोके बाजूला ठेवून मुलाच्या आयुष्याला प्राधान्य देते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. रक्ताच्या नात्यापेक्षाही आईच्या मायेचे नाते किती मोठे असते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अवयवदानाच्या माध्यमातून एखाद्याला नवजीवन मिळू शकते, हा संदेशही या घटनेतून समाजासमोर आला आहे.

अमोल यांच्या कुटुंबीयांनी या कठीण काळात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. शस्त्रक्रियेनंतर अमोल यांना नव्या आयुष्याची उमेद मिळाली असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शहापूरसह अमळनेर तालुक्यातील नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत. सचिव कैलास पाटील, सरपंच सुमनबाई दौलत पाटील, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, प्रदीप बाळू पाटील, सुभाष पाटील, योगेश पाटील, लक्ष्मण पाटील, कैलास कोळी, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी अमोल यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना निरोगी आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound