बोरघाटात भीषण अपघात: अंजनसोंडेतील एक ठार, ११ जण जखमी


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ तालुक्यातील पाल-खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. अंजनसोंडे येथून शेतकरी मेळाव्यासाठी निघालेल्या चारचाकी क्लूझर वाहनाचा (MH19 CF 3920) चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला घसरून झाडांना धडकले आणि उलटले. या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातात अंजनसोंडे येथील ५५ वर्षीय विजय राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते शेतकरी मेळाव्यासाठी सहकाऱ्यांसह पाल गावात जात होते. बोरघाटातील एका तीव्र वळणावर वाहनाचे नियंत्रण सुटल्याने हे दुर्दैवी अपघात घडला. क्लूझर झाडांवर आदळून उलटल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेनंतर मार्गावरील काही नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित पाल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील हरी ओम मल्टी स्पेशालिटी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू केला आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसणे, घाटातील तीव्र वळण आणि चालकाचा ताबा सुटणे ही प्राथमिक कारणे समोर आली आहेत.

या दुर्घटनेमुळे अंजनसोंडे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत्यूमुखी पडलेले विजय राणे हे गावात सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातातून एक गोष्ट स्पष्ट होते – डोंगराळ वळणांवर वाहन चालविताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी वेग मर्यादेचे पालन करून वाहन चालवावे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती कायम राहते.