Home Cities जळगाव आणीबाणीच्या लढवय्यांचा गौरव: जळगावात १७५ लोकशाही सेनानींचा सन्मान

आणीबाणीच्या लढवय्यांचा गौरव: जळगावात १७५ लोकशाही सेनानींचा सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकशाही रक्षणासाठी आणीबाणीत समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव करणे ही आपली कृतज्ञता असल्याची भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १७५ लोकशाही सेनानींचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सेनानींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.

यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. तसेच, मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी, अजित मेंडकी आणि उदय भालेराव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तुमच्या संघर्षामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली आहे. देश जगभर लोकशाही राष्ट्र म्हणून आपली छटा उमटवत आहे. आता देशात सर्वसामान्यांच्या कल्याणापासून ते विविध पायाभूत सोयीसुविधा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडवला जात आहे.” आ.सुरेश भोळे यांनीही आणीबाणीच्या काळातील सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी, अजित मेंडकी आणि उदय भालेराव यांनी आपल्या मनोगतातून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आणि शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील १७५ व्यक्तींनी आणीबाणीच्या लढ्यात भाग घेतला होता. यातील हयात असणाऱ्या अनेकांनी मंचावर येऊन आपला गौरव स्वीकारला, तर दिवंगत व्यक्तींच्या नातेवाईकांनी हा सन्मान स्वीकारला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले, त्यांनी या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.


Protected Content

Play sound