प्रामाणिकपणा ही जीवन जगण्याची पद्धत बनावी – प्रा. ललवाणी

bhusaval 5

भुसावळ, प्रतिनिधी | प्रामाणिकपणा हा केवळ एक गुणच नाही तर ते एक वर्तन आहे, जर आपली जीवनशैली प्रामाणिक असेल तर आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक राहिल. त्यासाठी प्रामाणिकपणा हा आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा एक भाग बनायला हवा, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक दिलीप ललवाणी यांनी येथे केले.

 

भुसावळ येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आयोजित सतर्कता सप्ताहातील इमानदारी एक जीवनशैली या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक पुरूषोत्तम सेलूकर तर प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, माजी प्राचार्य बी. आर. पाटील यांच्यासह सहाय्यक डाक अधीक्षक शीतल म्हस्के, भुसावळ पोस्टमास्तर मोहम्मद इजाज उपस्थित होते. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान डाक कार्यालयात सतर्कता सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्त निबंध स्पर्धा, मार्गदर्शनपर कार्यक्रम, पोस्टाकडून अपेक्षा, ग्राहक मंच आदी कार्यक्रम राबविले जात आहेत. दि. २९ रोजी सायंकाळी मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला.

नोकरीतून आनंद मिळावा – डॉ. जगदीश पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, आनंद देणे आणि मिळवणे हेच आपल्या जीवन जगण्याचे ध्येय राहिल्यास आपण कुठेही काम करत असल्यास त्या कामाचा आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. निष्ठेने काम करण्याची आपली ही ऊर्जा सातत्याने सुरू राहिल्यास इतरांवरही त्याचा परिणाम होऊन आपले काम ही आपली पूजा ठरेल आणि उदरनिर्वाहासाठी असणाऱ्या नोकरीचा आनंद व आत्मिक समाधान प्रत्येकाला मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

लोककल्याणाची भावना विकसित व्हावी – सेवानिवृत्त प्राचार्य बी.आर. पाटील म्हणाले की, प्रामाणिकतेमुळे समाजात आदर मिळतो. आपल्यात आत्मविश्वास वाढतो. लोककल्याणाची भावना विकसित होते. प्रामाणिकपणा ही आपल्या आत्म-समाधानाची एक महत्त्वाची पायरी आहे. जर आपण प्रामाणिकपणाने आपले जीवन जगले तर आपल्या जीवनात शांती आणि समाधान असेल.

अध्यक्षीय मनोगतात डाक अधीक्षक पुरूषोत्तम सेलूकर म्हणाले की, प्रामाणिकपणा हे विश्वासाचे दुसरे नाव आहे. अप्रामाणिक वागण्याने जीवनात अपराधीपणाची भावना येते आणि आपले मन नकारात्मकतेने भरुन टाकते. आयुष्यात या नकारात्मकतेचा कधीतरी त्रास सहन करावा लागतो. जर आपण प्रामाणिकपणे जगलो तर आपल्यात दोषीपणाची भावना उद्भवणार नाही आणि आपण सकारात्मक विचार करू, असेही श्री.सेलूकर यांनी सांगितले.

यावेळी कर्मचारी भास्कर गुरव यांच्या तत्परतेबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डाक कर्मचाऱ्यांमध्ये एफ.आर. तडवी, सय्यद फारूख, हेमंत कुरकुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज शेख यांनी तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश चौधरी, अमोल नेहते तसेच सर्व टपाल कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content