जळगाव, प्रतिनिधी | सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी नेहमीच एसटी बसला प्राधान्य देत असतात. यातच एसटी महामंडळाचे उद्दिष्ट जरी प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे असले तरी महामंडळातील एसटी कर्मचारीदेखील वेळोवेळी प्रामाणिकपणा दाखवून देत असतात. याचाच प्रत्येय आज जळगाव बसस्थानकात आला. एका वाहकाला बसमध्ये बॅग राहिलेली आढळून येताच त्याने ती प्रामाणिकपणे बॅग मालकाच्या हवाली केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सध्या सुरक्षितता पंधरवडा साजरा केला जात आहे. सोमवार दि. १३ जानेवारी रोजी धुळे ते जळगाव प्रवास करीत असताना गुरुदत्त अनंतराव महाजन व त्यांच्या परिवाराची एक महत्वपूर्ण बॅग ते बसमध्ये विसरले आणि आकाशवाणी चौकात घाईगर्दीत उतरून गेले. ही बस ही जळगाव बस स्थानकावर आली असताना सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर एसटी वाहक मनोज देविदास गवळी यांनी बस तपासली असता त्यांना एक काळया रंगाची बॅग रॅकवर ठेवलेली आढळली. त्यांनी ती बॅग तपासली असता त्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे काही रोकड व एक लॅपटॉप दिसून आला. त्या बागेच्या खालच्या बाजूस एका चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या मोबाईल नंबरवर मनोज गवळी यांनीसंपर्क साधून प्रवाशांस बसस्थानकावर आज मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी बोलावून घेतले होते. जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, एसटी कामगार सेनेचे गोपाळ पाटील, प्रभाकर सोनवणे, सोपान सपकाळे यांच्यासमक्ष सदर प्रवाशाला ती बॅग वाहक गवळी यांनी सुपूर्द केली.याप्रसंगी गुरुदत्त महाजन या प्रवाशाने गवळी यांचा फुल गुच्छ देऊन सत्कार केला. त्याच सोबत या महाजन यांनी वाहक गवळी यांना १००० रुपये बक्षीस म्हणून देण्याचा प्रयत्न केला असता वाहकाने हे बक्षीस घेण्यास विनम्रपणे नाकारले. एसटी महामंडळात सध्या सुरक्षितता पंधरवडा सुरू असून या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला.