रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्या प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चाललेला असताना, विवरे येथील दोन तरुणांनी दिलेला प्रामाणिकपणाचा आणि चांगल्या संस्कारांचा परिचय संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायक ठरला आहे. सापडलेले दोन लाख रुपये किमतीचे सोने परत करत त्यांनी मानवतेचा एक सुंदर संदेश दिला आहे.
सोमवारी, ओम गिरीश राणे (वय २३) आणि करण गिरीश राणे (वय २४), दोघेही रा. विवरा बु., ता. रावेर, हे रावेर पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांची भेट घेतली आणि ग्रामिण रुग्णालय, रावेर येथे त्यांना तीन सोन्याच्या अंगठ्या सापडल्याची माहिती दिली. अंगठ्यांचा मालक कोण आहे याची त्यांना कल्पना नव्हती.
दरम्यान, पोलिस निरीक्षक जयस्वाल यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांना प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. पोउपनिरीक्षक पाटील, पो.हे.कॉ. सुनील वंजारी व अतुल गाडलोहार यांच्या मदतीने चौकशी सुरू झाली. थोड्याच वेळात हे सोनं भिकन नथ्थु धनगर (वय ८५, रा. मुंजलवाडी, ता. रावेर ) यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
या अंगठ्यांचे वजन सुमारे २० ग्रॅम असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. अंगठ्या हरवल्यामुळे चिंतेत असलेल्या धनगर यांना त्या परत मिळाल्यावर त्यांनी रावेर पोलिसांचे आणि या दोन तरुणांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी दोघांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसही दिले.
या प्रामाणिक वर्तनाबद्दल रावेर पोलिसांनी ओम व करण यांचा फुलगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत म्हटले, “हे तरुण आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहेत. त्यांच्या कृत्यामुळे समाजात चांगल्या संस्कारांची आणि नैतिकतेची जाणीव टिकून आहे हे दिसून येते.”
ही घटना केवळ सोनं परत मिळाल्याची नसून, समाजात आजही चांगुलपणा आणि प्रामाणिकतेचे बीज जिवंत आहे हे सिद्ध करणारी आहे. ओम व करण राणे यांच्या या उदात्त कृत्याला सलाम!