एचआयव्ही बाधित महिलेचे शस्त्रक्रियेने वाचले प्राण

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एचआयव्ही बाधित महिलेचे शस्त्रक्रिया करून प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश मिळाले आहे. या  महिलेस अनेक दवाखान्यातून उपचार करण्यास नकार दिला होता. अखेर जिल्हा रुग्णालयात महिलेचे प्राण वाचले आहे. गेल्या १० दिवसांपासून सदर महिला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. 

चोपडा येथील ४५ वर्षीय महिलेच्या पतीचे  १० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून पोटात त्रास होत होता. त्या एचआयव्ही बाधित होत्या. त्यांना अनेक रुग्णालयात दाखविण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेची गरज असल्याने कोणी दाखल करण्यास तयार नव्हते. अखेर सदर महिला हि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेला तपासून तत्काळ शस्त्रकिया करण्याचा निर्णय घेतला. 

त्यांनी पोटाची तपासणी केली. गर्भपिशवीचा त्रास असल्याचे दिसून आल्याने तत्काळ शस्त्रक्रिया करून वैद्यकीय पथकाने गर्भपिशवी काढली. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. आता महिला पूर्वपदावर येत असून प्रकृती स्थिर आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. बनसोडे यांना डॉ. अश्विनी घैसास, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, परिचारिका नीला जोशी यांनी सहकार्य केले. 

“गुंतागुंतीच्या आणी दुर्लभ शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता यशस्वी होत आहेत. महिलांनी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारे पोटदुखी अनेक दिवस राहिली तर तत्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणीला यावे”  असे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे म्हणाले. 

 

Protected Content