जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत जळगाव जिल्ह्याने यंदाच्या आर्थिक वर्षात ऐतिहासिक कामगिरी करत स्वयंरोजगार निर्मितीत ‘हजारी’ टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच तब्बल एक हजार उद्योग प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यात जिल्ह्याला यश आले असून, त्यामुळे बेरोजगार युवकांसाठी नव्या संधींचे दार खुले झाले आहे.
जळगावसह सांगली, कोल्हापूर, अमरावती आणि नाशिक या पाच जिल्ह्यांनीही यंदा प्रत्येकी एक हजार उद्योग प्रस्ताव मंजूर करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मंजूर प्रस्तावांना बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळाले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाखांपर्यंत तर सेवा क्षेत्रासाठी १० लाखांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद या योजनेत आहे. त्यामुळे ‘नोकरी शोधणाऱ्यां’ऐवजी ‘नोकरी देणारे’ बनण्याकडे युवकांचा कल वाढताना दिसत आहे.

यंदाच्या वर्षात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बँकांशी समन्वय साधून कर्ज मंजुरी प्रक्रियेला गती दिली. सर्व बँकांना प्रस्तावांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दरमहा आढावा बैठका घेऊन मंजूर आणि प्रलंबित प्रस्तावांची सातत्याने समीक्षा करण्यात आली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांना गती मिळाली आणि मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली.
डिसेंबर २०२५ पर्यंत सुमारे ३०० प्रस्ताव मंजूर झाले होते. मात्र, काही बँकांकडून अपेक्षित गती मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सामूहिक बैठक घेतली. या बैठकीत बँकांचे प्रतिनिधी, अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी आणि अन्य विभागांचे अधिकारी सहभागी झाले. त्यानंतर उर्वरित ७०० प्रस्तावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आणि ३१ मार्चपूर्वी सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्यात लघुउद्योग, सेवा व्यवसाय आणि उत्पादन युनिट्स उभारण्यास मोठी चालना मिळाली आहे. बँकांच्या पतपुरवठ्यामुळे युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध झाले असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला गती मिळत आहे.
जिल्ह्याने पहिल्यांदाच ‘हजाराचा’ टप्पा गाठल्यामुळे युवकांमध्ये स्वावलंबनाची भावना बळकट होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास जळगाव जिल्हा स्वयंरोजगार निर्मितीत राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केला आहे.



