लखनऊ वृत्तसंस्था । लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.
तिवारी यांचं लखनऊमधील नाका परिसरातील खुर्शीद बाग येथे कार्यालय आहे. दोन इसम त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले. दोघांकडेही मिठाईचे डबे होते. त्यात धारदार चाकू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत चहा देखील घेतला. त्यानंतर त्यांचा गळा चिरून ते फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच, तिवारी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. हत्येपूर्वी त्यांना एक फोनही आला होता. हा फोन नेमका कोणी केला होता? हल्लेखोर परिचितांपैकी होते का?, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तिवारी यांना आलेल्या मोबाइल क्रमांकही ट्रेस केला जात आहे. मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं तिवारी काही दिवसांपूर्वी वादात अडकले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं अलीकडंच त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले होते.
मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. ज्यानंतर लखनऊ भागातली दुकानंही बंद करण्यात आली होती. आता कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्यानंतरही लखनऊमध्ये तणाव आहे. बाजारपेठेतील सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत.