‘हायवा’ चोरणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

jalgaon LCB Crime news

जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यातील एकाच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी टाटा कंपनीचा हायवा चोरून नेल्याप्रकरणी चिखलठाणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील हायवा मुक्ताईनगर शहराकडून जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हायवासह दोघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, राहुल गुसिंगे रा. जोडवाडी जि. औरंगाबाद यांच्या मालकीचा 15 लाख रूपये किंमतीचा हायवा (मोठा ट्रक) 23 सप्टेंबर रोजी घरासमोर पार्किंग करून लावला होता. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी चिखलठाण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील हायवा हा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळ असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथक रवाना केले. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे जावून चौकशी केली असता संशयित आरोपी अनिल रामसिंग जोनवाल (वय-२६)रा. खडी पिंपळगाव ता.खुलताबाद जि.औरंगाबाद आणि संजय धनसिंग जंघाले (वय-३५) रा. डोंगरगाव सिम ता. फुलंब्री जि. औरंगाबाद यांना चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील हायवा ट्रक जप्त करण्यात आला असून दोन्ही संशयित आरोपींना चिखलठाणा (औरंगाबाद ग्रामीण) पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील स.फौ. अशोक महाजन, रवींद पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, विनोद पाटील, अनिल देशमुख, अश्राफ शेख, दिपक पाटील, दिपक शिंदे, मुरलीधर बारी यांनी कारवाई केली.

Protected Content