अमेरिकेतील युवतीची नांद्रा येथील विद्यार्थ्यांना मदत

जळगाव प्रतिनिधी | जन्मापासून परदेशात राहून देखील आपल्या मूळ गावाशी एखाद्याची नाळ ही किती घट्ट असू शकते याचे उदाहरण तालुक्यातील नांद्रा येथील मूळ रहिवासी आणि सध्या अमेरिकेत असणार्‍या जिया पाटील या विद्यार्थीनीने दाखवून दिले आहे. तिने आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुध्द व थंड पाणी मिळावे म्हणून मदत पाठविली असून याचे परिसरातून कौतुक होत आहे.

या संदर्भात माहिती अशी की, नांद्रा बुद्रूक येथील मूळ रहिवासी असणारे सुनील दत्तात्रय पाटील अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात स्थायीक झालेले आहेत. ते स्वत: अभियंता असून त्यांची मुलगी जिया ही पंधरा वर्षाची विद्यार्थीनी आहे. ती जन्मापासून अमेरिकेत राहत असली तरी तिला आपल्या वडिलांच्या मूळ गावाविषयी आणि तेथील लोकांविषयी आत्मीयता आहे. यामुळे आपण गावासाठी व विशेष करून येथील विद्यार्थ्यांसाठी काही तरी मदत करावी असा आग्रह तिने आपल्या वडिलांकडे धरला. आणि सुनील पाटील व त्यांच्या पत्नीने याला आनंदाने होकार दिला.

या अनुषंगाने जिया पाटील हिने आपल्या सुटीतील दोन महिन्यांच्या कालखंडात रिच मॉल या एका मॉलमध्ये नोकरी करून पैसे कमावले. यातून तिला भारतीय चलनातील सुमारे ४० हजार रूपये मिळाले. यातून तिने नांद्रा बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला वॉटर कुलर भेट म्हणून देण्याचे ठरविले. यानुसार नुकतेच हे कुलर शाळेला प्रदान करण्यात आले आहे.

गट शिक्षणाधिकारी निलेश चौधरी, सुनील पाटील, जिया पाटील आदींसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नांद्रा बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला हे वॉटर कुलर भेट म्हणून देण्यात आले. जिया पाटील हिच्या मदतीचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

Protected Content