जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस बरसत असून यामुळे भाद्रपदसारख्या पित्तर पाट्याच्या दुपारच्या उन्हातही गारठा वाढला आहे. आज सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहतूकदारांना अडचणींचा सामना करावा लागल्याचं चित्र दिसून आलं.
शहरातील बजरंग बोगद्याच्या खाली तीन ते चार फूट पाणी साचल्याने गणेश कॉलनीतून पिंप्राळा व एसएमआयडी कॉलेज परिसरात जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता मात्र काही काळानंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत सुरु झाली. दरम्यान सिव्हील हॉस्पिटलसमोरील रोडावरदेखील गुढगाभर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
शहरातील पांडे चौक, बी.जे. मार्केट, गोलाणी मार्केट परिसरात गटारीचे पाणी सस्त्यावर आल्याने नागरीकांसह वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे मेहरूण तलावाजवळील सांडपाण्याच्या नाल्याला देखील पुर आला होता. त्यामुळे तांबापूराजवळील महादेव मंदीरासमोरील पुलावरून पाणी ओसंडून वाहत होते.
जळगाव शहरात अमृत योजनेचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असल्याने मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने याकडे त्वरित लक्ष द्यावे. अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.