आरोग्य कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक हजेरीला विरोध; प्रशासनाला दिले निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली फेस रीडिंग बायोमेट्रिक हजेरीची सक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रे येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात कास्ट्राबाईट कर्मचारी महासंघाने प्रशासनाला निवेदन दिले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांची ड्यूटी २४ तास आणि फिरतीची असते. प्रत्येक उपकेंद्राला ५ ते ७ गावे जोडलेली असून, आरोग्य सेवक आणि सेविकांना दररोज १०० ते १५० घरांना भेटी देणे, आरोग्य सेवा सत्र आयोजित करणे आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत सेवा पुरवणे ही त्यांची नियमित कामे आहेत. याव्यतिरिक्त, पर्यवेक्षकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना उपकेंद्रांना भेटी देऊन कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामाचे निरीक्षण करावे लागते.

प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे ही अत्यावश्यक सेवा पुरवणारी केंद्रे असून ती २४ तास कार्यरत असतात. रात्री-अपरात्री अपघात, साथरोग आणि प्रसूतीसारख्या तातडीच्या परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते. शासनाला याची जाणीव असूनही, अशा कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करणे अन्यायकारक आहे. शहरी भागातील रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांची ड्यूटी शिफ्टनुसार आणि निश्चित वेळेत असली तरी, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास अनिश्चित असतात आणि त्यांना चोवीस तास सेवा द्यावी लागते.

अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ एकच परिचारिका (एएनएम) चोवीस तास सेवा देत असते. त्यांना बदली कर्मचारी नसल्यामुळे प्रसूती आणि शस्त्रक्रियेनंतरही सतत सेवा पुरवावी लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. आरोग्य उपकेंद्र स्तरावर केवळ एक आरोग्य सेवक आणि एक सेविका कार्यरत असून, त्यांना अनेक गावांतील आरोग्य सेवा आणि रिक्त उपकेंद्रांचा अतिरिक्त भार सांभाळावा लागतो. डोंगराळ आणि आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांची परिस्थिती तर अधिक बिकट आहे, जिथे त्यांना दुर्गम भागातील अनेक वाड्या-पाड्यांवर फिरती करावी लागते.

आरोग्य सेवकांनाही नियमितपणे क्षेत्रीय भेटी द्याव्या लागतात आणि अनेक गावांतील लोकांपर्यंत आरोग्य सेवा व मार्गदर्शन पोहोचवावे लागते. आरोग्य सेवा सत्रांमध्ये ऑनलाइन नोंदणी करणे आणि इतर शासकीय कामांमध्ये मदत करणेही त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. ग्रामीण भागातील गरीब जनतेला आरोग्य सेवा पुरवणे हेच या कर्मचाऱ्यांचे ध्येय आहे आणि त्यांनी कोरोनासारख्या महामारीतही उत्कृष्ट काम केले आहे. असे असूनही, त्यांच्या कामाची दखल घेतली जात नसल्याची खंत कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

केरळ आणि तामिळनाडूमध्ये आरोग्य कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात आणि आरोग्य मानकांनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढत असून, त्यात बायोमेट्रिक हजेरीची सक्ती रुग्णसेवेवर नकारात्मक परिणाम करू शकते, अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा स्तरावरील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आणि सुट्ट्या निश्चित असताना, ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांवर वेळेचे बंधन आणि कामाचा अतिरिक्त भार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुर्गम भागात नेटवर्कची समस्या असल्यामुळे बायोमेट्रिक हजेरी लावण्यात येणाऱ्या अडचणींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Protected Content