मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्या देखरेखेखाली सुरू असलेल्या गटार बांधकामाचा अत्यंत निष्कृष्ट दर्जा समोर आला आहे. नागरिकांनी या कामात निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याची तक्रार यापूर्वीच केली होती आणि आता त्याचा प्रत्यय येत आहे. बसस्थानक ते बीएसएनएल ऑफिस रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीवर केवळ एका महिन्यापूर्वी बसवलेला धापा एका साध्या वाहनाच्या वजनाने फुटून पूर्णपणे कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ढाप्याचे आधारभूत असलेले लोखंडी आसाऱ्या देखील पूर्णपणे बाहेर निघाले आहेत, ज्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी पसरली आहे. अवघ्या एका महिन्यातच नव्याने बांधलेला गटारीचा भाग कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या पद्धतीवर आणि वापरलेल्या बांधकाम साहित्यावर गंभीर आरोप होत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की जर इतक्या कमी वेळेत हे बांधकाम ढासळले, तर उर्वरित काम किती निकृष्ट दर्जाचे असेल याची कल्पना करणेही कठीण आहे. त्यांनी या कामाच्या दर्जाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.