जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, आगामी ४ ते ८ तासांत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जाण्याची शक्यता असून तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा नदी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पुर्णा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली आहे. त्यामुळे हतनूर प्रकल्पात पाण्याची आवकेत वाढ होत आहे परिणामी हतनूर प्रकल्पातून पुढील ४ते ८ तासांमध्ये तापी नदी पात्रात पाणी प्रवाह सोडण्यात येण्याची शक्यता आहे. तरी पुढील हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये. तसेच प्रत्येक गावात दवंडी द्वारे देणे आवश्यक आहे, असे निर्देश संबंधित तहसीलदार प्रशासनाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.