औरंगाबाद (वृत्तसंस्था) निवडणूक प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात कन्नड पोलीस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांना तक्रार दिली होती.
अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात कन्नड पोलीस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भादवि कलम 188 प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव यांचीही जीभ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना घसरली होती. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली होती, त्यांनंतर त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपाकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली होती.