जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी खासदार हरीभाऊ जावळे यांची केलेली निवड ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. एक तर त्यांच्या समोर अनेक आव्हाने असली तरी समन्वयवादी स्वभावामुळे ते दोन्ही गटांना सोबत घेऊन चालतील. सर्वात महत्वाचे म्हणजे गटबाजीमुळे झालेले ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठीच त्यांची निवड करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
यावल-रावेर लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरीभाऊ जावळे यांचा धक्कादायम पराभव झाला. खरं तर बाजूच्याच मुक्ताईनगरातील रोहिणी खडसे यांच्या पराभवाची जितकी चर्चा झाली तितकी हरीभाऊंच्या पराभवाची झाली नाही. तथापि, त्यांच्या पराभवाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून त्यांचे कोणत्या तरी मार्गाने पुनर्वसन होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. आज ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी करण्यात आलेली निवड हे या दिशेने पक्षाने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी हरीभाऊ जावळे यांनी आपली नाराजी कधीही जाहीरपणे व्यक्त केली नाही. आपल्या पराभवाची कारणे हे वरिष्ठ पातळीवर कळवली असल्याच्या पलीकडे त्यांनी यावर काहीही भाष्य केले नाही. एकीकडे राज्यातील सत्ता गेल्यानंतर अनेक नेत्यांच्या नाराजीसह पक्षातील गटबाजी उफाळून आली असतांना हरीभाऊ जावळे यांनी पक्षहिताच्या नियमांची लक्ष्मणरेषा कधी ओलांडण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. २०१४च्या लोकसभा निडणुकीत ऐन वेळेस तिकिट कापले जाऊन खासदारकी आणि संभाव्य केंद्रीय मंत्रीपद गेले तरी ते काही बोलले नव्हते. यानंतर गत पंचवार्षीकमध्ये त्यांच्या मंत्रीपदाची संधीसुध्दा थोडक्यात हुकली तरी त्यांनी कधी जाहीर नाराजी व्यक्त केली नव्हती. तर विधानसभेतीर पराभवानंतरही त्यांनी आदळ-आपट केली नाही. याचेच फलीत हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीच्या माध्यमातून दिसून आले आहे. खरं तर या पदासाठी मोठी स्पर्धा होती. महानगराध्यक्षपद हे मराठा समाजाला दिल्याने ग्रामीण जिल्हाध्यक्ष हे लेवा पाटीदार समाजाला मिळणार असल्याचे आधीच संकेत मिळाले होते. या पार्श्वभूमिवर, शॉर्ट लिस्टमध्ये हरीभाऊंच्या सोबत अजय भोळे यांचे नाव आघाडीवर होते. भोळे हे तरूण व निष्ठावंत असून त्यांच्यावरदेखील अन्याय झालेला असल्याने त्यांचे नावदेखील समोर आले होते. तथापि, हरीभाऊ यांचा अनुभव आणि दोन्ही गटांशी असणारे सलोख्याचे संबंध हे निर्णायक ठरून त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता, हरीभाऊ जावळे यांचे मोठ्या पातळीवर पुनर्वसन होईल असे संकेत आधीच मिळाले होते. या आधी त्यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील. विशेष करून एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही मातब्बर नेत्यांमध्ये विभाजीत झालेल्या पक्षाची धुरा त्यांच्याकडे आलेली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात पक्षाला यश मिळवून देण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्ह्यात एक सक्षम राजकीय विरोधकाची भूमिका बजावतांना अंतर्गत कलहापासून मुक्ती मिळवण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. तूर्तास, हरीभाऊ जावळे यांची निष्ठा, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन, समन्वयवादी स्वभाव आदींमुळे त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्याचे दिसून येत आहे.