शिवसैनिकांची सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट

 

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । आज दुपारी शेकडो शिवसैनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात पोहोचले. मात्र, कर्नाटक पोलिसांकडून शिवसैनिकांना सीमेवरच रोखण्यात आलं. त्यामुळे सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं

सीमा भागातील मराठी बांधवांना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज हटावावा , अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना शिवसेने दिली होती.

यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटही झाली. शिवसैनिकांनी बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा देखील वापर केला. त्यामुळे शिवसैनिक आणि पोलीस आमनेसामने आले. मात्र, बेळगावात जाण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी बेळगावच्या सीमेवरच ठिय्या मांडला.

आम्हाला शिनोळीच्या मार्गाने शांततेत बेळगावात जाऊ द्या. अन्यथा आम्हाला गनिमी काव्याचा वापर करत बेळगावात प्रवेश घ्यावा लागेल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. मात्र, कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना बेळगावात प्रवेश द्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी सीमेवर ठिय्या मांडला. तसेच, मोठ्या प्रमाणात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी, महाराष्ट्र पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांशी चर्चा केली. तुम्हा आम्हाला तुमच्या मागण्या सांगा आम्ही त्या कर्नाटक सरकारपर्यंत पोहोचवू, असं पोलीस म्हणाले. मात्र, शिवसैनिक बेळगावात जाऊन भवगा फडकवण्याच्या निर्धारावर ठाम आहेत.

बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येऊपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दोन दिवसांपूर्वी राऊत बेळगाव दौऱ्यावर होते.

कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरीही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला

बेळगवाच्या जनतेने ७० वर्षे फार संघर्ष केला. प्रसंगी हौतात्म्य पत्करलं. पोलीस केसेस झाल्या, डोकी फुटली. त्यामुळे आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे येडियुरप्पांशी चर्चा करतील. या प्रश्नावर सध्या तातडीने एक बैठक होऊन काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच या भागातील मराठी भाषिक जनता सूटकेचा श्वास सोडेल. विशेषत: मराठी भाषा, संस्कृती, साहित्य या संदर्भातील ही लढाई आहे. हे टिकायला हवं आणि ते टिकेल असं मला वाटतं. कारण देशभरात आणि जगभरात मराठी भाषिक लोक राहतात. राजकारणाच्या दृष्टीने देखील त्यागोष्टी महत्त्वाच्या असतात, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

Protected Content