फैजपुरात गुटखा माफियांना दणका : तब्बल ८३ लाखांचा गुटखा जप्त !

फैजपूर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून जात असलेल्या गुटख्याच्या दोन आयशर फैजपूर पोलिसांनी जप्त केली असून सुमारे ८३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्यामुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,फैजपूर पोलिसांना बर्‍हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची गुपित माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने फैजपूरचे एपीआय निलेश वाघ यांनी कर्मचार्‍यांसह बुधवार, १० रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला. आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ पथक रवाना केले. दरम्यान, आयशर क्रमांक एम.एच.१९ सी.वाय. ९३६४ व एम.एच.१९ सी.एक्स.०२८२ ह्या दोन गाड्या आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता, त्यात गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे दोन्ही वाहने जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आली.

पंचांसमक्ष वाहनांचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेला ८३ लाख सहा हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. तर ३४ लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण एक कोटी १७ लाख सहा हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, नक्की माल कोणाचा हा तपास पोलीस करत आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (३३,कोदगाव, ता. चाळीसगाव, ह.मु.शास्त्रीनगर, चाळीसगाव), जयेश सुभाष चांदेलकर (३३,रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (२९, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व सुनील पाटील (३१, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) या चौघांना अटक केली असून गाड़ी चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ऐतिहासिक फैजपूर नगरीत गुटखा,मटका, सट्टा, पत्ता तेजीत असून या कडे पोलीस प्रशासन कानाडोळा करीत आहे.. हे सर्व धंदे पोलिसांच्या नाकावर टिच्चून जोरात सुरू आहे. या धंद्यावर पोलीस का कारवाई करीत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून यावर कार्यवाही करण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.

Protected Content