गुलाबभाऊंकडे बुलढाण्याचेही पालकत्व : आता कामांना गती मिळण्याची अपेक्षा

बुलढाणा-अमोल सराफ | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावसोबत बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने प्रलंबीत असणार्‍या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

काल रात्री राज्यातील पालकमंत्रीपदांची यादी जाहीर करण्यात आली. यात बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बुलढाणा हा जळगावला लागूनच असणारा जिल्हा असून आता गुलाबभाऊंच्या माध्यमातून जिल्ह्यातील कामांना गती मिळण्याची आस लागली आहे.

मध्यंतरी झालेल्या नाट्यमय घटनांच्या नंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. नंतर बर्‍याच दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. यात बुलढाणा जिल्ह्यातून कुणालाही संधी मिळालेली नाही. यानंतर बर्‍याच कालावधीने पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली असून यात गुलाबराव पाटलांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते मोठ्या खात्याचे मंत्री आहेत. यासोबत जळगावसारख्या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे असतांना बुलढाण्याला वेळ देतांना त्यांची थोडी तारांबख नक्कीच उडणार आहे. मात्र कमी वेळात जास्त काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.

कोणत्याही जिल्ह्याच्या विकासातील मुख्य कणा म्हणजे जिल्हा नियोजन मंडळ होय. याच डीपीसीची गेल्या आठ महिन्यांपासून बैठक झालेली नसल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कामे खोळंबली आहेत. यातच अतिवृष्टीने झालेले नुकसान, ठिकठिकाणी झालेली रस्त्यांची दुर्दशा आदी मुद्दे देखील महत्वाचे आहेत. आता जिल्ह्यास पालकमंत्री मिळाल्यामुळे या सर्व अडचणी दूर होतील अशी बुलढाणा जिल्हावासियांना अपेक्षा लागली आहे.

Protected Content