भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील अंजनविहरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म जळगाव आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेती दिनाचे आयोजन शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र जळगाव कार्यालयाकडून नवीन तंत्रज्ञानाचा तसेच विविध पिकांच्या वाणांचा शेतकऱ्यांमार्फत प्रचार केला जातो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कृषी विज्ञान केंद्र कार्यालयाने अंजनविहरे येथील शेतकऱ्यांसाठी गहू पिकाच्या फुले समाधान या वाणाचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. हे प्रात्यक्षिक सध्या उत्कृष्ट स्थितीत असून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म जळगाव येथील विषय विशेषज्ञ कृषी विद्या डॉ. शरद जाधव आणि किरण जाधव (विषय विशेषज्ञ उद्यान विद्या) उपस्थित होते. तसेच, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे भडगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे, मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे, कृषी पर्यवेक्षक सुहास भालेराव, कृषी सहाय्यक सचिन पाटील आणि सुखदेव गिरी हे उपस्थित होते.
डॉ. शरद जाधव यांनी प्रात्यक्षिके आणि शेती दिनाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. त्यांनी पिकाचे लागवड तंत्रज्ञान व फुले समाधान या वाणाची गुणवैशिष्ट्ये शेतकऱ्यांना समजावून सांगितली. फुले समाधान हा गव्हाचा वाण बागायती, वेळेवर तसेच उशिरा लागवडीसाठी योग्य असून त्याची उत्पादकता अधिक आहे, तसेच चपातीची गुणवत्ता इतर वाणांच्या तुलनेत चांगली आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील हंगामात शेतकऱ्यांनी गहू लागवडीमध्ये फुले समाधान या वाणाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. किरण जाधव यांनी भाजीपाला व फळ पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक सुहास भालेराव यांनी ‘ॲग्रिस्टॅक’ या योजनेबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम रांजणवेरे येथील शेतकरी श्री संभाजी विश्वासराव पाटील यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संभाजी पाटील व इतर शेतकऱ्यांनी फुले समाधान या वाणाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. बहुतेक शेतकऱ्यांनी फुले समाधान या गहू पिकाच्या वाणाबद्दल बोलताना, उत्पादन तसेच गुणवत्तेबद्दल शेतकऱ्यांना समाधान देणारा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मनोज बोरसे, आशिष पवार, प्रथमेश वाल्हे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव गिरी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी केले.