महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २७८० कोटींची घोषणा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा केली  आहे. महाराष्ट्रातील या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आलाय

 

जळगाव-मनमाड ( मार्गे भडगाव – चाळीसगाव – नांदगाव ) राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे च्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणाही गडकरींनी केली. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे.

 

राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आल्याचं गडकरी यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. गडकरी यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये खास करुन कोकणावासियांसाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचं चित्र दिसत आहे.

 

 

नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी  वेगवेगळ्या ट्विटमध्ये प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग १६६ ई वरील गुहार चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं आहे.

 

गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय.

 

राष्ट्रीय महामार्ग ७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे.

 

तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दोन पदरी रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी २८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.

 

तारीरी- गगनबावडा – कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग १६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये देण्यात येत असल्याचं गडकरींनी सांगितलं आहे.

 

तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७५३ अंतर्गत २८.२ किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.

 

नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उढ्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एखूण ४७८ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

 

नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग असेल.

आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ५४३ साठी २३९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

 

राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Protected Content