नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सकाळी वणी-सप्तश्रुंगी गडाच्या दरम्यान बसला झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील महिला ठार झाली असून याच अपघातात जळगाव जिल्ह्यातील १३ भाविक जखमी झाले आहेत. ही माहिती मिळताच आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मुंबई येथून नाशिक गाठत तेथील जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
या संदर्भातील माहिती अशी की, आज सकाळी , नाशिक जिल्ह्यातील वणी-सप्तश्रुंगी घाटात आज पहाटे बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात २४ प्रवासी प्रवास करीत होते. बसला गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाला. यात एक महिला मयत झाली असून २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अशाबाई राजेंद्र पाटील ( वय अंदाजे ५५) ही महिला ठार झाली असून ती अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवासी आहे. याच अपघातात २१ जण जखमी झाले असून यात मुडी येथीलच १२ जणांचा समावेश आहे. तर जळगावातील भोकर येथील एक जण जखमी झालेला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे आणि जिल्हाधिकार्यांशी बोलून रूग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती जाणून घेतली. यानंतर ते लागलीच दुपारी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. येथे त्यांनी अपघातात जखमी झालेल्या रूग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच त्यांनी मयत महिलेच्या आप्तांशी संवाद साधून संवेदना व्यक्त करत शासकीय मदतीचे आश्वासन दिले.