Home Cities जळगाव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी! गुलाबराव पाटलांनी पोखरी तांड्यात ग्रामस्थांसोबत घेतला फराळाचा आनंद

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी! गुलाबराव पाटलांनी पोखरी तांड्यात ग्रामस्थांसोबत घेतला फराळाचा आनंद

0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी! गुलाबराव पाटलांनी पोखरी तांड्यात ग्रामस्थांसोबत घेतला फराळाचा आनंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला गेला असतानाच त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आधार देण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत साजरी केली. आपल्या मतदारसंघातील बंजारा समाजबहुल पोखरी तांडा येथे त्यांनी शेतकरी, महिला, लहान मुले आणि ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद अनुभवला. विशेष म्हणजे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांसोबत एकाच थाळीत दिवाळीचा फराळ घेत आपुलकीचा संदेश दिला.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वास देण्यासाठी राज्य सरकारने मंत्र्यांना दुष्काळी भागात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोखरी तांडा या गावाची निवड करत शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दिवाळी साजरी केली.

गावात आगमन झाल्यानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पालकमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी महिलांनी पारंपरिक गाणी सादर करत नृत्याच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला. बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या स्वागताने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या भेटीदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी, महिला, लहान मुले आणि ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. दिवाळीच्या फराळासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत एकाच थाळीत बसून फराळाचा आस्वाद घेतला. मंत्री आणि ग्रामस्थ यांच्यातील हा आपुलकीचा क्षण उपस्थितांसाठी विशेष ठरला. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सणाच्या काळातही शेतकऱ्यांना आपण एकटे नसल्याची जाणीव करून देणारी पालकमंत्र्यांची ही दिवाळी भेट ठरली.