Home Cities अमळनेर मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविणाऱ्या डॉ. दीपक पाटील यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार 

मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविणाऱ्या डॉ. दीपक पाटील यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार 

0
मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविणाऱ्या डॉ. दीपक पाटील यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्या प्राण्यांची सेवा, त्यांच्यावर वेळेत उपचार आणि संकटाच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखविलेले धाडस, या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांना राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युवकभारती संस्था आणि खाटू श्याम बाबा देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नुकतेच पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये डॉ. पाटील यांच्या पशुसेवेतील योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला.

डॉ. दीपक पाटील हे पंचायत समिती अमळनेरचे माजी उपसभापती असून पशुधन पर्यवेक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात त्यांनी पशुवैद्यकीय सेवेद्वारे अनेक मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या जनावरांवर शस्त्रक्रिया करणे, औषधोपचार करणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे, अशा कामांमध्ये ते सातत्याने सक्रिय असतात. याशिवाय जनावरांचे लसीकरण, गर्भपात व वंध्यत्व तपासणी, कृत्रिम रेतन, पशुगणना यांसारख्या तांत्रिक कामांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ग्रामीण भागातील पशुपालकांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत त्यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांच्या कार्यातील विशेष उल्लेखनीय घटना म्हणजे नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घडलेली गोठ्याला लागलेली भीषण आग. २८ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका गोठ्याला आग लागली होती. या दुर्घटनेत १८ गायी भाजल्या गेल्या, तर दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीमुळे गोठ्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. या संकटाच्या वेळी नाशिक पशुचिकित्सालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव आहेर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. दीपक पाटील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली. आगीत भाजलेल्या गायींना वाचविण्यासाठी त्यांनी तातडीने प्रयत्न केले. योग्य वेळी वैद्यकीय उपचार आणि दाखविलेल्या धाडसामुळे दोन गायींचा अपवाद वगळता इतर गायींचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक झाले होते.

याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवकभारती संस्था आणि खाटू श्याम बाबा देवस्थान समितीच्या वतीने डॉ. दीपक पाटील यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पशुसेवेतील योगदानाला मिळालेल्या या सन्मानामुळे मांडळ गावासह अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला युवकभारती संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. दत्ता ठाकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील (नगरसेवक तथा सुरत महानगरपालिकेचे माजी उपमहापौर) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी लोटन पाटील (शेतकी संघ अध्यक्ष), गणेश भामरे (शेतकी संघ उपाध्यक्ष, अमळनेर), आशा ठाकरे (माजी सभापती), सचिन बाळू पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर), कोकिळाबाई ठाकरे (सरपंच) आणि सुमित मसाले, सुरतचे उद्योजक प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.