महापालिकेच्या इमारतीसमोर रस्त्यातील दुभाजकात चक्क विना परवानगी शुभेच्छा फलक

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोरच रस्त्यातील दुभाजकांमध्ये चक्क विना परवानगी शुभेच्छा फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील अनधिकृत फलकांबाबत सामाजिक कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महापालिकेचे कार्यकारी कर अधीक्षक नरेंद्र चौधरी व किरकोळ वसुली विभागातील लिपीक अजय बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांकडून दि.१७ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान शहरातील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर तसेच फलकांची पाहणी करण्यात आली. यात महापालिकेच्या इमारतीसमोरच रस्त्यातील दुभाजकात वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा असा आशय असलेले फलक दिसून आले. या फलकाबाबत कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर महापालिका उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या आदेशानुसार लिपीक अजय बिऱ्हाडे यांनी गुरुवारी शहर पोलिसात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन अवैधरित्या फलक लावून शहराचे विद्रुपीकरणास कारणीभूत अज्ञात व्यक्तीविरोधात महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम सन १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content