ग्रंथाली’ची विज्ञान आणि आरोग्य जागृती यात्रा १६ तारखेला जळगावात येणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘ग्रंथाली’ने महाराष्ट्रात सुरुवात म्हणून बारा जिल्ह्यांत आरोग्य आणि विज्ञानजागृती करण्यासाठी विशेष यात्रा योजली आहे. आरोग्य आणि विज्ञान हे आपल्या जगण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. त्याचे भान राखल्यास आपले व समाजाचे आरोग्य चांगले राखता येईल. या हेतूने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ख्यातनाम डॉक्टरांची मुलाखत, परिसंवाद, वर्कशॉप, व्याख्यान आणि ‘विज्ञानधारा’अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद हे यात्रेचे स्वरूप असणार आहे.

चिपळूण, रत्नागिरी येथे २४ नोव्हेंबर २०२३ रोजी आरंभ होऊन यात्रा नागपूर, चंद्रपूर, अमरावती, कऱ्हाड, कोल्हापूर या जिल्ह्यांत जाऊन १६ डिसेंबरपासून जळगावमध्ये येत आहे. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन इरगेशन सिस्टिम्स लि., जळगाव, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव आणि एम.जे. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान होणार्‍या यात्रेतील कार्यक्रमांचे आयोजन के.सी.ई.सोसायटीचे ओजस्विनी कला महाविद्यालय येथे केले जाणार आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विज्ञान व आरोग्यविषयक माहिती देणार्‍या पोस्टर आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांच्या हस्ते होणार आहे.

याच दिवशी ‘विज्ञानधारा’अंतर्गत शास्त्रज्ञ डॉ.शरद काळे स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तर दुपारी २ ते २.३० या वेळेत ते स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक प्रबोधन करणार आहेत.

रविवार, १७ तारखेला, सकाळी १० ते १२ या वेळेत डॉ. यश वेलणकर ‘जीवनोत्सव’ या कार्यक्रमात मू.जे.विद्यालयातील ओल्ड कॉन्फरन्स हॉलमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी विशेष वर्कशॉप घेणार आहेत. त्यासाठी नाव नोंदणी करावी लागेल, जी विनामूल्य आहे. याच ठिकाणी डॉ.यश वेलणकर आणि डॉ. मयूर मुठे ‘जीवनशैली व आरोग्य’ यावर व्याख्यान देतील, ते सर्वांसाठी खुले असेल.

१७ तारखेला डॉ. शरद काळे आणि डॉ. सतीश नाईक जैन हिल्सवरील गांधी सेंटर व जैन इरिगेशन येथे भेट देऊन आरोग्य व विज्ञान या विषयी मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी दुपारी १.३० ते ३, अनुभूती विद्यालयातील विद्यार्थ्यांशी डॉ. शरद काळे संवाद साधतील. तर त्याचवेळी डॉ. सतीश नाईक आरोग्याची कॅप्सुल’अंतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक उद्बोधन करतील.

सोमवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० डॉ.शरद काळे मू.जे.विद्यालयातील ओल्ड कॉन्फरन्स हॉलमध्ये बीएड, बिपीएड व डीएडच्या विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन करतील. डॉ. सतीश नाईक त्याच ठिकाणी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत विद्यार्थ्यांशी आरोग्यसंवाद साधतील. डॉ. हेमंत जोशी तेथेच ११.३० ते १२.३० या वेळेत विद्यार्थ्यांना आहार-विहार आणि आजार याबाबत प्रबोधन करतील.

डॉ. शरद काळे १८ तारखेला सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ओरीऑन स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये, दुपारी १ ते २.३० या वेळेत ओरीऑन सीबीएसई स्कूल येथे आणि दुपारी ३ ते ४.३० या वेळेत ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय या तीन ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन करणार आहेत.

या दिवशी सायंकाळी ६ वाजता, मू.जे.विद्यालयातील ओल्ड कॉन्फरन्स हॉलमध्ये डॉ. सतीश नाईक ‘आरोग्याची कॅप्सुल’अंतर्गत डॉ. सुधीर शहा यांची जाहीर मुलाखत घेतील. या सर्व कार्यक्रमांत थोडा वेळ रसिकांना प्रश्न/शंका विचारता येणार आहेत.

आरोग्य आणि विज्ञान याबाबत समाजमाध्यमातून प्रसारित होणारे गैरसमज दूर व्हावे, दुरुपयोग टळावा, जगणे सुसह्य होण्यास मदत व्हावी या हेतूने योजलेल्या यात्रेतील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे, सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत पोस्टर आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन ग्रंथालीतर्फे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, धनश्री धारप यांनी केले आहे

Protected Content