जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात आगमन झाल्यानंतर ना. अनिलदादा पाटील Minister Anil Bhaidas Patil यांचे जबरदस्त जल्लोषात स्वागत करण्यात आले.
राज्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. यात रविवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आकस्मीकपणे राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी तातडीने आपल्या सहकार्यांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीचे प्रतोद तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा देखील समावेश होता. अगदी काही तासांमध्ये घडलेल्या या घडामोडींनी राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला. अर्थात, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मंत्रीपदाच्या माध्यमातून सुखद धक्का देखील बसला.
ना. अनिल पाटील Minister Anil Bhaidas Patil यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील बैठकांसह अन्य महत्वाची कामे असल्याने ते मुंबईतच होते. यानंतर आज म्हणजेच ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते वाराणसी महानगरी एक्सप्रेसने ते सकाळी सातच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले. याप्रसंगी फलाटावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ना. अनिल पाटील यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार जयघोषात ना. अनिलदादांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ना. अनिल पाटील यांनी ट्रेनमधून उतरण्याआधी चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.
हे देखील वाचा : अनिल पाटलांच्या रूपाने जिल्ह्यात मराठाशक्तीचा उदय !
ना. अनिल पाटील हे ट्रेनमधून उतरल्यानंतर फलाटावर त्यांना मानाचा फेटा बांधण्यात आला. यानंतर पुष्पवर्षावरत त्यांचे स्वागत करण्यात आले. तर अनेक जणांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. फलाटावरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी जयघोषाने परिसर दुमदुमला होता. फलाटावरून बाहेर आल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले. यानंतर ते पायी चालत समर्थकांसह पुढे आले. याप्रसंगी दोन जेसीबींमधून त्यांच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद देशमुख, रवींद्र नाना पाटील, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, ॲड. कुणाल पवार आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर ना. अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले. येथेच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यानंतर मंत्री ना. अनिल भाईदास पाटील हे अजिंठा विश्रामगृहाकडे रवाना झाले असून ते सकाळी नऊच्या सुमारास अमळनेरकडे प्रयाण करणार आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. तर अमळनेरात मंगळग्रह मंदिरात पूजा केल्यानंतर तेथून ते ना. पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत समर्थकांची बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तर, यानंतर सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ना. अनिल पाटील यांची लाडू-तुला करण्यात येणार आहे.
खाली पहा : ना. अनिल भाईदास पाटील यांचे जळगावात आगमन झाले असता रेल्वे स्थानकावर करण्यात आलेला स्वागताचा व्हिडीओ !
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/782606250017688