पाचोरा प्रतिनिधी । येथील मनोज महाजन यांचे आज सकाळी अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात खुद्द मनोज महाजन यांनी बहारदार ठेका धरल्याने उपस्थितांच्या आनंदाला उधाण आले.
नुकताच नागरी सेवा परिक्षांचा (युपीएससी) निकाल जाहीर झाला असून यात मूळचे पाचोरा येथील मनोज सत्यवान महाजन यांची १२५ व्या रँकने निवड झाली आहे. त्यांना भारतीय प्रशासनीक सेवा म्हणजेच अतिशय मानाची आयएएसची रँक मिळाली आहे. हे वृत्त आल्यानंतर शहरासह तालुक्यातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आयएएस वर्गवारीत निवड झाल्यानंतर मनोज महाजन आज पहिल्यांदाच आपल्या गावी अर्थात पाचोर्याला आले असता त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आज सकाळी सचखंड एक्सप्रेसने आगमन झाल्यानंतर मनोज महाजन यांचे फलाटावरच वाजंत्रीच्या तालावर स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांची एका वाहनातून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मनोज महाजन यांनी वंदन केल्यानंतर मिरवणूक निघाली. रेल्वे स्थानकापासून ते संघवी कॉलनीतील त्यांच्या घरापर्यंत मनोज महाजन यांची मिरवणूक निघाली. याच्या पुढे बँड पथक लावण्यात आले होते. जागोजागी महाजन यांचे स्वागत झाले. माळी समाजाचे तालुका अध्यक्ष संतोष महाजन शरद गीते मयूर महाजन ज्ञानेश्वर महाजन लष्मण जाधव अशोक महाजन वीर मराठा मावळा संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष गणेश शिंदे, प्रशांत पाटील, सोनू सोनार यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान, या मिरवणुकीत मनोज महाजन यांचे स्नेही आणि आप्तांनी ताल धरला. तर आप्तांच्या आग्रहाखातर स्वत: मनोज महाजन यांनीही बहारदार नृत्य केल्याने उपस्थितांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, अनेक तरूणांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेतल्याचेही दिसून आले.
पहा : पाचोरेकरांनी आपल्या कर्तबगार सुपुत्राचे केलेले भव्य स्वागत.
उत्कृष्ट मिरवणूक पाचोरा शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला.