बारामती प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आज बारामती शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा पवार यांचे आज पहिल्यांदाच बारामती शहरात आगमन झाले. समर्थकांनी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आले. ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याला उत्तर देतांना अजितदादा म्हणाले की, सत्काराला सर्व जातीधर्माचे लोक रस्त्यावर आले होते. खूप आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. काही शाळेतले मित्र भेटले. वडीलधारे आशीर्वाद देत होते. अनेकांना धक्काबुक्की, त्रास झाला. त्याबद्दल दिलगीरी मी व्यक्त करतो. आता पाच वर्षांत खूप काम करायचं आहे. पुणे जिल्ह्यात दौंड सोडून सर्व भागातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. जनतेनं जे काम केलं, त्याला तोड नाही.
ना. अजित पवार पुढे म्हणाले की, बारामती हे एक कुटुंब आहे. शरद पवार साहेबांनी १९६७ पासून राजकारणात काम करायला सुरुवात केलं. त्यांनी अनेकांना मोठं केलं. पदं दिली. आपण सारे एका घरातल्याप्रमाणे आहोत, हीच शिकवण आम्ही पवार साहेबांकडून घेतली असल्याचे ते म्हणाले.