स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमळनेरकरांची भव्य तिरंगा बाईक रॅली

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियांनातर्गत क्रांतिदिनी हजारोंच्या जनसमुदायाने एकत्र येत पर्यावरणाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीही शहरात भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिता वाघ यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून  अमळनेरकरांची ही भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात येऊन देशाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.

सकाळी ११ वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून या रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, सर्व संचालक मंडळ आणि माजी आ. डॉ.बी.एस.पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून देशभक्तीपर घोषणाबाजी करत रॅलीला सुरुवात झाली. यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, खा.शि.मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे, निरज अग्रवाल यासह अनेकांची उपस्थिती होती.

रॅलीच्या पुढे सजावट केलेल्या ओपन जिप्सीत माजी आ. स्मिता वाघ व  सैन्य दलातील काही आजीमाजी सैनिकांनी विराजमान होत जनतेला अभिवादन केले. तर रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या महिला भगिनींनी फेटा परिधान केला होता. ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा देत ही बाईक रॅली शहराच्या दिशेने निघाली.

रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत –

उड्डाण पूलावरून प्रमुख पेट्रोल पंप, ढेकु रोडवरील शिवतीर्थ स्मारकाला माल्यार्पण केल्यानंतर पिंपळे रोड, तहसील कार्यालय, स्टेशन रोड, सुभाष चौकात सुभाष बाबूजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून राणी लक्ष्मीबाई चौकातून दगडी दरवाजा च्या आतील सुवर्णकार समाजाच्या स्मारकास माल्यार्पण, तेथे सराफ बांधवानी पुष्यवृष्टी केली. त्यानंतर जय बजरंग व्यायाम शाळा व पानखिडकीच्या पदाधिकाऱ्यांनी रँलीवर पुष्प वर्षाव केला. तेथून वाडी चौक, भोई वाडा येथे पवनपुत्र व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पवर्षाव केला. त्यानंतर पुढे झामी चौक गणेशोत्सव मंडळ व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या मार्फत पुष्पवर्षाव झाला. मंगलादेवी चौकात फटाक्यांची प्रचंड आतीषबाजी करण्यात आली. न्यु व्हिजन इंग्लिश स्कूलच्या लहान चिमुकल्यानी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून हातात तिरंगा ध्वज घेत फुलांचा वर्षाव केला. त्यांनी अतिशय जोरदार घोषणाबाजी करत रँलीचे स्वागत केले. तिरंगा चौकात आल्यावर तिरंगा ध्वजास प्रदक्षिणा केल्यानंतर धुळे रोडवरील दुकानदार, रिक्षा युनियन, टँक्सी युनियन यांनी पुष्पवर्षाव केला. शेवटी भाजप नेते स्वर्गीय उदय वाघ यांच्या बाजार समिती समोरील स्मारकावर देशभक्तीच्या घोषणा देऊन समारोप करण्यात आला.

यांचा होता रॅलीत सहभाग –

सदर तिरंगा बाईक रॅलीत खान्देश रक्षक ग्रुप,अमळनेर, खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर, लायन्स क्लब, रोटरी क्लब, मेडिकल असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, अमळनेर महिला मंडळ, टॅक्सी युनियन, सराफ व्यावसायिक, भाजपा, भाजयुमो आणि महिला मोर्चाचे सर्व शहर व ग्रामीण पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, नोकरदार वर्ग विविध राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. रॅलीच्या आयोजनासाठी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content