Home धर्म-समाज फैजपूरमध्ये ‘खंडोबावाडीचा महाराजा’चा भव्य आगमन सोहळा; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय जल्लोष

फैजपूरमध्ये ‘खंडोबावाडीचा महाराजा’चा भव्य आगमन सोहळा; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय जल्लोष

0
5


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जय मल्हार गणेश मित्र मंडळ, फैजपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खंडोबावाडीचा महाराजा’ आगमन सोहळा रविवारी, ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत गणरायाच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि भक्तांच्या जयघोषामुळे संपूर्ण फैजपूर नगरी गणेशमय झाली होती.

सोहळ्याच्या प्रारंभी मंडळाचे मार्गदर्शक व खंडोबावाडीचे उत्तराधिकारी परमपूज्य महामंडलेश्वर पवनदासजी महाराज, तरुणांचे प्रेरणास्थान व फैजपूर नगरपालिका गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे सर तसेच फैजपूर नगरपालिका उपगटनेते तथा नगरसेवक सूरजदादा गाजरे यांच्या शुभहस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली. पूजनानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली.

बसस्थानकासमोरील गुरुदेव प्लाझा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, म्युनिसिपल हायस्कूल परिसर मार्गे मिरवणूक खंडोबावाडीचा महाराजा मंडपापर्यंत नेण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा केला.

भव्य आगमन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, नगरसेवक पवन सराफ, नगरसेवक राहुल गुजराती यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेत सोहळ्यात सहभाग नोंदविला.

या आगमन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते जळगाव येथील पेशवा वाद्य पथकाचे दमदार वादन. ढोल-ताशांच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्त नृत्य सादर करत वातावरणात चैतन्य निर्माण केले. त्यासोबतच पेपर ब्लास्ट, आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी आणि लायटिंग छत्री यामुळे मिरवणुकीची शोभा आणखी वाढली.

‘एक नवीन रूपात…’ या संकल्पनेवर साकारण्यात आलेल्या खंडोबावाडीच्या महाराजांच्या भव्य आणि मनमोहक स्वरूपाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गणरायाच्या आकर्षक सजावटीचे आणि मूर्तीच्या देखणेपणाचे उपस्थितांनी कौतुक केले. संपूर्ण मिरवणुकीत भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

आगमन सोहळा यशस्वी करण्यासाठी जय मल्हार गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अनेक दिवस नियोजन व मेहनत घेतली. मिरवणुकीचे नियोजन, सजावट, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच कार्यक्रमाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन यासाठी मंडळाच्या सदस्यांनी योगदान दिले.

कार्यकर्त्यांच्या एकजुटीला भाविकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ‘खंडोबावाडीचा महाराजा’चा आगमन सोहळा भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, हितचिंतक आणि सर्व गणेशभक्तांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या या आगमन सोहळ्यामुळे फैजपूर शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया… खंडोबावाडीच्या महाराजांचा विजय असो!’ या जयघोषाने संपूर्ण फैजपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.


Protected Content

Play sound