


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खेडीढोक (ता. पारोळा) येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा पारोळा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीला गेलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान खेडीढोक येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांनी गोकुळ उर्फ दादू धर्मसिंग पाटील (वय २२, रा. खेडीढोक, ता. पारोळा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ५० हजार रुपये रोख, ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा खडा अंदाजे ६३ हजार रुपये, ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा खडा अंदाजे ९९ हजार रुपये आणि ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अंदाजे ४५ हजार रुपये असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज आहे.
पारोळा पोलिसांच्या जलद तपासामुळे घरफोडीचा गुन्हा अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आला असून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.



